मी समुद्र बोलतोय......
बाळांनो, कसे आहात सुखी आहात ना ? तुमच्याकडे थोडा वेळ आहे का या अभाग्याकडे पहायला ? मी समुद्र तुम्हाला भरभरुन देणारा तुमच्यावर पित्या प्रमाणे प्रेम करणारा, आजवर मी माझ्या गर्भातुन तुम्हाला खनिज तेल, वाळु, मीठ, मासे, मौल्यवान मोती देत आलो. पण तुम्ही मला काय दिले ??
नाही ना आठवत... मी सांगतो तुम्ही मला आजवर दिलात ते फक्त प्लास्टिक कचरा, केमिकलचे सांड पाणी, मलमूत्र, प्लास्टर ऑफ पेरिसची हानिकारक माती, मोठाल्या बोटीं मधुन निघणारे हानिकारक तेल... अजुन बरेच काही... तरीही मी गप्प राहिलो फक्त तुमच्यासाठी, पण आता नाही रहावल म्हणून तुम्हाला विनवणी करतोय ऐकाल ना माझं...??
पुर्वार्धापासुन मी मानवाला पहात आलोय अगदी त्याच्या अंगावर कपडे नसल्या पासून ते आत्ता त्याच्या अंगावर कोट येई पर्यन्त... मी खुश आहे मानवाने प्रगती केली मानव सुधारला, पण खरच मानव सुधारला की फक्त दिसण्यापुरते सुधारला ? पहिल्यापेक्षा मानव आता अधिक घाण करु लागलाय. हे पर्यावरण हा निसर्ग मानवाने टिकवला तरच तो ही टिकू शकेल याचा जणू त्याला विसरच पडलाय. माणूस आता स्वार्थी झालाय.
ही पहा (फोटो) माझी पिल्ले कशी निपचित पडलेली आहेत. यांच्या मृत्युचे कारण तुम्ही आहात. तुम्ही केलेल्या प्रदूषणामुळे यांना आपला जिव गमवावा लागलाय. याच प्रायश्चित्त करण्या ऐवजी तुम्ही यावर दुर्लक्ष करताय असे कसे काय तुम्ही करु शकता ?
हे प्रेमी युगुलानों माझ्या किनार्यावर येता ना वेळ घालवायला पण कधीतरी माझ्यावर ही प्रेम करा ना...
हे मित्र-मैत्रिणींच्या टोळक्यानो एकत्र येताना किनारी मजा मस्ती करायला पण माझ्या सोबत पण कधी मैत्री करा ना...
अरे, तुम्ही देवाला पुजता ना त्याच देवाने ही सृष्टि बनवली आहे मग तुम्ही या निसर्गाला का नाही जपत ??
मी पण ना कुठे तुम्हाला सांगत बसलोय, ज्या देवाला तुम्ही पुजता त्याच देवाला तुम्ही पायदळी तुडवता हे विसरलोच होतो.
पण, मानवा एक लक्षात ठेव जर आत्ताच तू लक्ष नाही दिलेस तर याचे नक्कीच तुला गंभीर परिणाम भोगावे भोगावे लागतील आणि याचा सर्वस्वी जवाबदार तूच असशील....
तुमचाच समुद्र....
©लेखन: भावेश कदम.
(विचारांच्या दुनियेतून)